मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनंही ‘मिशन बिगिन अगेन’साठी काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. राज्यात या सूचना ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून काही निर्बंध शिथिल केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी कायम असेल.
सर्व बाजारपेठा आणि दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहतील. तसंच ५ ऑगस्टपासून मॉल्स उघडायला देखील सशर्त परवानगी दिली आहे. मॉल्समधली चित्रपटगृहं, फूड कोर्ट मात्र बंदच राहतील. मात्र, मॉल्समधली रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचं किचन सुरू करायला तसंच खाद्यपदार्थ घरपोच पाठवायला मुभा दिली आहे.
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा जास्तीत जास्त १०० कर्मचारी असलेल्या कार्यालयांमध्ये, कमाल १५ व्यक्तींच्या उपस्थितीत काम करता येईल, तसंच खासगी कार्यालयंही १० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येतील.
सांघिक खेळ वगळता गोल्फ, नेमबाजी, जिमनॅस्टीक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांना ५ ऑगस्टपासून मोकळ्यावर खेळायला परवानगी दिली आहे. मात्र हे खेळ खेळताना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचं कोटेकोर पालन करणही अनिवार्य असेल.
टॅक्सी आणि कॅबमध्ये चालक आणि तीन प्रवासी, रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी तसंच दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट आणि मास्कसह प्रवासाची मुभा दिली आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणं अनिवार्य राहील. जलतरण तलाव बंदच राहतील.