मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली

मुंबई : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,  स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.