हँडलूम मार्क योजनेसाठी मोबाइल ऍप्प आणि बॅकएंड वेबसाइट सुरू करणे, माय हँडलूम पोर्टल सुरू करणे, आभासी प्रदर्शन आणि  कुल्लू येथील क्राफ्ट हँडलूम व्हिलेजचे दर्शन यांचा  कार्यक्रमात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हातमाग क्षेत्र हे देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातील उदरनिर्वाहाचा  महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे कारण 70 टक्क्यांहून अधिक  विणकर आणि संबंधित कामगार या महिला आहेत.

07 ऑगस्ट 2020 रोजी 6 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालय कोविड -19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून  कार्यक्रम आयोजित करत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग आणि  महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील तर वस्त्रोद्योग  सचिव रवि कपूर सन्माननीय अतिथी असतील.  हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर हे शिमला  येथून व्हर्च्युअल मोडच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी  होतील.

या व्यतिरिक्त, या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण भारतभरातील हातमाग समूह, एनआयएफटी कॅम्पस, सर्व  28 विणकाम सेवा केंद्रे (डब्ल्यूएससी), राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ (एनएचडीसी), हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद (एचईपीसी), तसेच कुल्लू (हिमाचल) येथील क्राफ्ट हँडलूम व्हिलेज , मुंबईतील  वस्त्रोद्योग समिती आणि एचईपीसीद्वारा  चेन्नई येथे आयोजित व्हर्च्युअल फेअरबींग ऑनलाइन जोडले  जाईल. तसेच,  हातमाग विकास आयुक्तांच्या कार्यालयात , डब्ल्यूएससी आणि एनएचडीसी  च्या सर्व अधीनस्थ कार्यालयांमध्ये तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) च्या विविध संकुलांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

1905 साली याच तारखेला सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ 7 ऑगस्टची  राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवड झाली. हातमाग उद्योगाबाबत  आणि सामाजिक-आर्थिक विकासातील याचे योगदान याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे हा यामागचा उद्देश  आहे.

या निमित्ताने आणि नागरिकांमध्ये हातमाग विणकामातील कारागिरीबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी  हातमाग विणकाम करणार्‍या समाजासाठी सोशल मीडिया मोहिमेचे नियोजन केले आहे. पंतप्रधानांनी आवाहन केले आहे की भारतीय हातमाग आणि हस्तकलेचा वापर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याबद्दल इतर लोकांनाही माहिती द्यायला हवी.  या उत्पादनांचे वैभव आणि विविधतेबद्दल जितके जास्त जगाला समजेल  तितकाच आपल्या कारागीर आणि विणकरांना त्याचा अधिक फायदा होईल.

वस्त्रोद्योग मंत्री  स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारचे सर्व मंत्री, नायब राज्यपाल राज्यांचे मुख्यमंत्री , संसद सदस्य आणि प्रख्यात उद्योगपतीनी  मित्र आणि कुटुंबासह  त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे विणकर समाजाशी एकता व्यक्त करण्याचे आणि  इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सचिवांना अशीच  विनंती  केली आहे. याशिवाय, राज्यातील सर्व राज्यांचे सचिव, निर्यात प्रोत्साहन  परिषद, केंद्रीय रेशीम बोर्ड, राष्ट्रीय जूट बोर्डासारख्या सहयोगी वस्त्रोद्योग संस्थाना कॉमन हॅशटॅगअंतर्गत सोशल मीडिया मोहिमेचा विस्तार  करण्याची विनंती केली आहे आणि सहयोगी आणि कर्मचार्‍यांना हातमाग वस्त्रे स्वीकारण्यास प्रेरित केले आहे. ई-कॉमर्स संस्था,  रिटेल कंपन्या आणि डिझायनर संस्थांना देखील हातमाग  उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन  देण्याची विनंती केली आहे.

अभूतपूर्व कोविड -19 महामारी आणि प्रदर्शन, मेळा इत्यादी पारंपरिक विपणन कार्यक्रम आयोजित करण्यात असमर्थतेच्या पार्श्वभूमीवर, सरकार विणकर आणि हातमाग उत्पादकांना ऑनलाइन विपणन संधी उपलब्ध करुन देत आहे. “आत्मनिर्भर भारत” साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकून हातमाग निर्यात प्रोत्साहन  परिषद आभासी मेळावा  आयोजित करत आहे. या मेळ्यामध्ये देशातील विविध भागांतील 150 हून अधिक सहभागींना त्यांची उत्पादने आणि विशिष्ट डिझाईन आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिलेल.

इंडियन टेक्सटाईल सोर्सिंग फेअर 7, 10 आणि 11 ऑगस्टला खुले असेल. या मेळाव्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहक समुदायासाठी खास पटोला , पैठणी,  इकत, कांडंगी, माहेश्वरी, वेंकटगिरि आणि इतर अनेक जीआय टॅग केलेली  उत्पादने प्रदर्शनात असतील जेणेकरून उत्पादने थेट कारागिरांकडूनच  मिळू शकतील.

07 ऑगस्ट 2020 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात जिल्हा प्रशासन, कुल्लू यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित करण्यात आलेल्या क्राफ्ट हँडलूम व्हिलेज, कुल्लू यांचे सादरीकरण, एचईपीसीतर्फे चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या संभाव्य ग्राहकांशी  हातमाग निर्यातकांना जोडण्यासाठी व्हर्च्युअल फेअरचे उद्घाटन, हँडलूम मार्क स्कीम (एचएलएम) साठी मोबाइल ऍप्प आणि  बॅकएंड वेबसाइट सुरू करणे, मे हॅन्डलूम पोर्टल सुरु करणे इत्यादींचा समावेश आहे.

पहिला राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केला होता. या दिवशी हातमाग विणकाम करणार्‍या समुदायाचा गौरव केला जातो आणि या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये या क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला जातो. आपल्या हातमागच्या वारशाचे रक्षण करण्याच्या आणि हातमाग विणकर आणि कामगारांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांना सक्षम बनविण्याचा संकल्प करण्यात आला. सरकार हातमाग विणकर आणि कामगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून आणि त्यांच्या उत्कृष्ट कारागिरीबाबत  अभिमान रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.