मुंबई : मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.
अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या भेटीदरम्यान त्यांनी अकादमीच्या कामकाजाची माहिती घेतली व सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. राष्ट्रीय अकादमीच्या धर्तीवर अकादमीचा विकास करण्यासाठी त्या – त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देशही ही श्री. देशमुख यांनी दिले. पु ल अकादमीने, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावे, ग्रंथालयासारख्या सुविधा निर्माण करून द्याव्यात, नाट्य व चित्रपट क्षेत्राशी निगडीत सुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर व अन्य सभागृह पूर्ण क्षमतेने चालावीत आणि कलाकारांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी अधिक काय करता येईल, याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, अवर सचिव भरत लांगी व इतर अधिकारी उपस्थित होते.