नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहरानं देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी नाशिकचा देशात 39 वा क्रमांक होता.
तिथुन थेट पंधराव्या क्रमांकावर उडी घेताना नाशिकनं नागपूर, पुणे या मोठ्या शहरांनाही मागं टाकलं आहे. नाशिक शहरात पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यास सुरूवात झाली असून, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीच्या माध्यमातून शहरात प्रकल्प राबवले जातात.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून मिशन स्मार्ट सिटी अंतर्गत देशभरातील शंभर शहरांचं मुल्यमापन करून हे मानांकन दिलं जातं. नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण 52 प्रकल्प आहेत. त्यातील 22 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सध्या स्मार्ट सिटीच्या निधीतील 540 कोटी रूपयांचे नऊ प्रकल्प सध्या सुरू आहेत.