मुंबई : क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण करण्यात आले. यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, हॉकीपटू रानी रामपाल यांना देण्यात आला.
विविध क्रीडा प्रकारातील पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील खेळाडू असे – अर्जुन पुरस्कार-अजय सावंत (घोडेस्वारी), राहूल आवारे (कुस्ती), सारिका काळे (खो खो), दत्तू भोकनाळ (नौकानयन), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), सुयश जाधव (पॅरास्विमिंग) आणि ध्यानचंद पुरस्कार प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन). तर लक्ष्य इन्स्टिट्यूट (पुणे) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट (मुंबई) यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातील या खेळाडू आणि संस्थांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीने राज्याच्या क्रीडा गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या सर्वांचे तसेच देशातील अन्य राज्यातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग नॉरगे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे.