नवी दिल्ली : कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉक-४ ची नियमावली जारी करण्यात आली असून राज्यातली टाळेबंदी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातली जिल्हांतर्गत ई पासची अटही काढून टाकण्यात आली असून खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी देण्यात आली आहे.
६५ वर्षावरील आणि १० वर्षाखालील व्यक्तींना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून काही प्रमाणातल्या शारीरीक कसरतींनाही परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली असून सरकारी कार्यालयातल्या गट अ आणि ब अधिकाऱ्यांसाठी शंभर तर इतर कर्मचाऱ्यांसाठी किमान ३० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
या काळात सर्व प्रकारची दुकानं सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शिकवणी वर्ग मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.