मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्यक असल्याचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  आज मंत्रालयात झूम च्या माध्यमातून कोकण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्र,पोलीस अधीक्षक, दीक्षितकुमार गेडाम अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या या संकटाशी सामना करीत असताना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वारंवार वाहतुकीच्या आणि प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करीत आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि कामगारांची संख्या लक्षणीय आहे. याचा विचार करीत आणि त्यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रवासासाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणे व जाणे सोयीस्कर होणार आहे. तसेच तपासणी नाक्यांवर प्रवेश करणाऱ्यांची प्राथमिक माहिती घेतली जाईल. थर्मल स्कॅनिक करण्यात येणार आहे. गोवा राज्यातून कामानिमित्त जिल्ह्यात येणारे व गोवा राज्यात जाणारे यांना परवानगी असेल. आता जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या झाल्या असल्याचे सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

बैठकीत वाळू लिलाव संदर्भात ही चर्चा करण्यात आली.