मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने उद्या गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक सभागृह काशिराम विद्यालय, रबाळे, ठाणे येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांनी अजरामर केलेली गीते शाहिर रामलिंग जाधव आणि सहकारी सादर करणार आहेत.

अण्णा भाऊ साठे हे पोवाडा आणि लावणी यासारख्या लोकसंगीत शैलीच्या वापराने लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या विशेष लेखनापैकी ‘फकिरा’ या कांदबरीस 1959 साली ‘राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णा भाऊ साठे यांनी कादंबरी, लघुकथा यांच्या व्यतिरिक्त नाटक, रशियाची भ्रमंती, पटकथा आणि पोवाडा शैलीतील गाणी लिहिली आहेत.

‘मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार’ या बाबतचे आशयपूर्ण वर्णन त्यांच्या साहित्यातून दिसून येते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात अण्णा भाऊंच्या शाहिरी लेखनीला शाहिर गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांनी आपल्या शाहिरीने जनमानसात पोहचविले आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रेरित झाला.