मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काही ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरच्या गावांमधे काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातल्या पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं. अंबाजोगाई तालुक्यात देवळा परिसरात शेतात तयार ऊस जमीनदोस्त झाला. सोयाबीन, ज्वारी, मूग, मका पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीनच्या पिकाचंही करपा आणि बुरशीनं नुकसान  होत आहे.

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि हदगाव तालुक्यातल्या काही भागांत काल रात्री मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. किनवट तालुक्यातल्या देहली इथं सर्वात जास्त ५५ मिलिमीटर तर पिंपरखेड इथं सर्वात कमी ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

लातूर जिल्ह्यात येळी ढोकी, भिसेवाघोली, शिराळा या परिसरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोयाबीन, उडीद, ज्वारीसह चारा पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, असे आदेश आमदार धीरज देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.