अतिशय निष्ठेने देशाची सेवा करतानाच हे पोलीस अधिकारी सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करतील- केंद्रीय गृह मंत्री

सेवे प्रती त्यांची निष्ठा आपल्या युवकांना भारतीय पोलीस सेवेत भर्ती होण्यासाठी प्रेरणा देईल असा केंद्रीय गृह मंत्र्यांचा विश्वास

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवेच्या 71 व्या नियमित भर्ती,2018 च्या तुकडीतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या, हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी इथे झालेल्या दीक्षांत परेडनिमित्त त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अधिकाऱ्याना संबोधित केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानतांनाच, त्यांचे स्फूर्तीदायी भाषण युवा अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि पोलीस आणि जनता यांचे संबंध दृढ कसे करावेत यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

दीक्षांत परेड निमित्त युवा पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच,  अतिशय निष्ठेने देशाची सेवा करताना हे पोलीस अधिकारी सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करतील. सेवेप्रती त्यांची निष्ठा आपल्या युवकांना भारतीय पोलीस सेवेत भर्ती होण्यासाठी प्रेरणा देईल असा विश्वास गृह मंत्र्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान, गृह मंत्री यांच्या बरोबरच केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी आणि गृह सचिव अजय भल्ला स्वतंत्रपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला केंद्रीय गृह मंत्र्यांनी या तुकडीतल्या प्रशिक्षणार्थींना, नवी दिल्लीत औपचारिक संवादादरम्यान  संबोधित केले होते. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अखंड काम करणाऱ्या सेवेचा एक भाग असल्याबद्दल या प्रशिक्षणार्थींना अभिमान वाटायला हवा असे गृहमंत्र्यांनी म्हटले होते. पोलिसांविषयी जनतेच्या मनातल्या  धारणेत सकारात्मक बदल घडवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

आयपीएस प्रशिक्षणार्थी तुकडीच्या 28 महिला अधिकाऱ्यांसह 131 प्रशिक्षणार्थीनी, 42 आठवड्यांचा मूलभूत अभ्यासक्रम-टप्पा- एकचे प्रशिक्षण अकादमीत पूर्ण केले आहे.

आयपीएस सर्व अधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर 2018 रोजी या अकादमीत प्रवेश घेतला होता. त्याआधी, त्यांनी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी तसेच तेलंगणातील डॉ मारी चन्नारेड्डी एचआरडी इन्स्टिट्यूटमधून आपला पहिला अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आयएएस, आयएफएस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा हा पहिला अभ्यासक्रम पूर्ण झाला.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत या प्रशिक्षणार्थींना विविध प्रशिक्षणाअंतर्गत कायदा, तपास, न्यायवैद्यक शास्त्र, नेतृत्व आणि व्यवस्थापन, गुन्हेगारीशास्त्र, सार्वजनिक सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा, मूल्ये आणि मानवाधिकार, आधुनिक भारतीय पोलीस व्यवस्था, फिल्ड क्राफ्ट आणि कौशल्ये, शस्त्रास्त्रे प्रशिक्षण आणि बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.