राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई : सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून दि. ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परिक्षेचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरता आले नाहीत. यासंदर्भात राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. विद्यार्थी हिताच्या या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मंजूरी देत बैठकीतच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांकरीता (सीईटी) अर्ज भरण्यासाठी दि. 07 व 08 सप्टेंबर, 2020 असे दोन दिवस एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.