नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, राजकीय हेतुने घेतलेला असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

कंगनाला सुरक्षा देण्याच्या निर्णयातून तिने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या विधानाला केंद्र सरकार पाठिंबा देत असल्याचं दिसून येतं, हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कंगनाने केलेल्या कथित आक्षेपार्ह ट्वीटनंतर तिच्या मुंबईत येण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दहा पोलीस तिच्या सुरक्षेत तैनात असतील.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयाची पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने कार्यालयाचं मोजमाप केलं असून, उद्या मंगळवारी हे कार्यालय पाडणार असल्याची सूचना मिळाला आहे, असं कंगनाने ट्वीट केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.