मुंबई : राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करुन कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. उपनगर जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिल्ह्यातील बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त, सर्व १५ वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने उपनगर जिल्ह्यात महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आवश्यक

पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहिमेचा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाला रोकण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वयंसुरक्षा) भर देणे गरजेचे आहे. तसेच हाऊसिंग सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्या आदी सर्व ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, स्वच्छता आदींबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जनजागृती करावी. महापालिकेनेही वॉर रुम आणि इतर संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्ती यांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य माहिती द्यावी. नवरात्रीचा सणही लवकरच येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मोहिमेसाठी महापालिकेमार्फत नियोजन

यावेळी उपनगरातील सर्व १५ वॉर्डमधील सहायक आयुक्त यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्या क्षेत्रात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत.