नवी दिल्ली : 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे यावर यावर्षी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

यानिमित्त 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. यामधे राज्यांचे आरोग्य विभाग, गृह विज्ञान महाविद्यालयं, वैद्यकीय संस्था, विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था आणि इतर संबंधितांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.

स्तनपानाविषयी पालकांमधे जागृती निर्माण करणे, मातांनी स्तनपान द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, स्तनपानाचे महत्व पटवून देणारे साहित्य पुरवणे ही जागतिक स्तनपान सप्ताहाची उद्दीष्ट आहेत.

माता आणि बालक या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने स्तनपान महत्वाचे आहे. तान्ह्या बाळांना होणारा अतिसार आणि श्वसनविषयक संसर्गाची लागण स्तनपानामुळे रोखली जात असल्याने बालमृत्यूदर कमी व्हायला मदत होते.

मातांमधे स्तन कर्करोग, अंडाशय कर्करोग, टाईप-2 मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका कमी करते. बालकांमधले लठ्ठपणाशी संबंधित विकार, मधुमेह यापासून स्तनपानामुळे संरक्षण मिळत असल्याने स्तनपानाचे महत्व मोठे आहे.

बालक जन्मल्यापासून तासाच्या आत स्तनपान, पहिले सहा महिने फक्त स्तनपान, इतर कोणतेही दूध नाही, बालक दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान सुरुच ठेवणे महत्वाचे आहे. स्तनदा माता आणि आंगणवाडी कार्यकर्त्यासाठी या आठवड्यात चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.