पुणे : कोविड- 19 च्या उपचारासाठी औषध, नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणी मध्ये तफावत आहे. त्यामुळे बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना वेळेत ही औषधे मिळत नाहीत. कोवीड – 19 रुग्णांना ट्रीटमेंट सुरु करण्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल- कोवीड- 19 प्रसिध्द केला आहे. या प्रोटोकॉल नुसार रेमडेसिवीर इंजेक्शन हे फक्त मॉडीरिट कंडीशन (ऑन ऑक्सीजन) असलेल्या रुग्णास देण्याच्या सूचना केल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी रेमडेसिवीर इंजेक्शन व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन च्या वापराबाबत प्रशासकीय अधिका-यांना मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्याची प्रत इंडीयन मेडीकल असोसिएशन यांना देखील पुरवण्यात आली आहे.
हॉस्पीटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्गमीत केलेल्या प्रोटोकॉल नुसार पूर्णपणे तपासणी व आवश्यक चाचण्या करुनच रुग्णाची स्थिती बघून आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन चा वापर करणे आवश्यक आहे. हे औषध कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक औषधे मिळण्यासाठी धावपळ करतात, ही बाब योग्य नाही. तसेच रुग्णालयातील वॉर्डबॉय/नर्सिंग स्टाफ ने रुग्णांच्या नातेवाईकांकडून औषध उपलब्ध करून देण्यासाठी जास्त पैशांची मागणी करणे अत्यंत गंभीर आहे.
हॉस्पीटल व्यवस्थापनाने – 1. क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल- कोवीड- 19 व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 2. हॉस्पीटलमधील रुग्णसंख्या (ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन ची आवश्यकता आहे) विचारात घेऊन गरजेनुसार मर्यादित साठा खरेदी करावा. जास्तीचा साठा खरेदी करून ठेऊ नये. 3. हॉस्पीटल कोवीड वॉर्ड मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वापराबाबत रजिस्टर तयार करावे. त्यामध्ये पेशंटचे नाव व पत्ता, औषधाचे नाव, समुह क्रमांक, वापरलेली संख्या व आकारलेली किंमत याबाबींचा समावेश करावा.4. काही कारणाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषधाचा पूर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पीटल फार्मसी किंवा रुग्णांच्या नातेवाईकास परत करावा व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे. 5. कोवीड वॉर्डात काम करणा-या कर्मचा-यांवर बारीक लक्ष ठेवावे व हॉस्पीटलमध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉस्पीटल मध्ये गैरप्रकार आढळून आल्यास हॉस्पीटल व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोवीड – 19 च्या गरजू रुग्णांना तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यपध्दतीचे अवलंबन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.