मुंबई :- सर करीमभाई इब्राहिम ट्रस्ट या निर्वासित मालमत्तेमधील कुलाबा चेंबर्स आणि मेहबूब इमारत या दोन्ही इमारतींची अवस्था जीर्ण असून, तातडीने या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे. इमारत पुनर्बांधणीसाठी सल्लागार नेमून अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
मंत्रालयात मुंबई शहरातील सर करीमभाई इब्राहिम ट्रस्टच्या निर्वासित झालेल्या पाच इमारती व डोसा बिल्डींग या इमारतीतींल रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, रहिवाशांचे प्राण धोक्यात येऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. या संबंधित इमारतींमधील व्यावसायिक आणि रहिवासी यांचे पुनर्वसन करताना नियमानुसार जागा देण्यात यावी. तसेच, कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने राबवावी.
कुलाबा येथील कुलाबा चेंबर्स, करीमभाई मॅनॉर, मोहम्मदभॉय मॅन्शन, मेहमुद बिल्डींग, माहिम मॅन्शन आणि डोंगरी येथील डोसा बिल्डींग या इमारतीतील रहिवाश्यांना सोसायटी तयार करून द्यावी व सल्लागार नेमून तातडीने पुढील कार्यवाही करण्यात यावी. संबंधित कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.
बैठकीस मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, तहसिलदार तथा व्यवस्थापकिय अधिकारी आशा शेंडगे, म्हाडाचे कार्यासन अधिकारी एस.एम.अहिरराव, कार्यकारी अभियंता एस.व्ही. वारर्डे आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.