नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळात भारताच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता आणि उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली असं प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या द्विपक्षीय व्हर्चूअल शिखर परिषदेचं आज उद्घाटन झालं. या परिषदेच्या उद्घाटनीय संबोधनात ते आज बोलत होते.

जगाला उपयुक्त ठरेल, अशा गाभा आर्थिक क्षेत्रांना बळकट करणं हाच आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेट्टे फेड्रीक्सन यांच्यात आज आभासी द्विपक्षीय शिखर परिषद झाली.

भारत-डेन्मार्क यांच्यादरम्यान विविध क्षेत्रात असलेलं सहकार्य वाढवण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमधे चर्चा झाली होती, आणि आज या आभासी शिखर परिषदेच्या माध्यमातून त्या कल्पनेला नवी दिशा आणि गती मिळाली आहे, असं मोदी यांनी आपल्या उद्घाटनीय संबोधनात सांगितलं.

जागतिक पुरवठा साखळीच्या बाबतीत कुण्या एका स्रोतावर अवलंबून राहणं धोक्याचं असल्याचं कोरोना महामारीनं दाखवून दिलं असून, भारत आता पुरवठा साखळीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत काम करत आहे. इतर समविचारी देशही या प्रयत्नांमधे सहभागी होऊ शकतात, असं आवाहन मोदी यांनी केलं.

ही शिखर परिषद भारत-डेन्मार्क परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठीच नव्हे तर इतर जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सहमती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.

ही शिखर परिषद उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधांसाठी मैलाचा दगड असल्याचं डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेट्टे फेड्रीक्सन म्हणाल्या. कोविड-१९नं आपणा सर्वांसमोर एक मोठं आव्हान उभं केलं असून, त्याचा एकत्रित मुकाबला करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.