नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 जून 2019 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परिक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आधारित मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.  या उमेदवारांनी व्यक्तीमत्‍व चाचणीच्या वेळी वय, शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भातली मूळ कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे. या उमेदवारांनी आयोगाच्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर 5.8.2019 ते 14.8.2019 च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या डीएएफ हा तपशीलवार अर्ज भरुन तो ऑनलाईन सादर करायचा आहे. डीएएफ दिलेल्या काळात सादर न करणाऱ्या उमेदवाराची  उमेदवारी आयोगाकडून रद्दबादल ठरवण्यात येईल. डीएएफ भरण्यासंदर्भातल्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवाराने त्या काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत सप्टेंबर 2019 पासून होण्याची शक्यता आहे. मुलाखतीची नेमकी वेळ उमेदवाराला ई-समन लेटरद्वारे कळवली जाईल. या संदर्भात उमेदवाराने आयोगाची https://upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिसरात या संदर्भात असलेल्या काउंटरवर उमेदवार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत व्यक्तीश: माहिती घेऊ शकतात अथवा 23388088, (011)-23385271/23381125/23098543 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

ऑनलाईन डीएएफ भरण्यासंदर्भात उमेदवाराला काही अडचण असल्यास ते 23388088/23381125 या क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधता येईल.