मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरातल्या प्राणीसंग्रहालयांच्या गुणवत्तेत वाढ करण्याच्यादृष्टीनं, केंद्र सरकार विस्तृत योजना तयार करण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वनं आणि हवामानबदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितलं.

वन्यजीव सप्ताह २०२०च्या निमित्तानं आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमात ते आज लहान मुलांसोबत संवाद साधत होत. पर्यटकांच्या प्राणीसंग्राहलयांच्या भेटी अधिक अनुभवसंपन्न व्हाव्यात, यासाठी वाढीव निधीची तरतुद केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

आपण निसर्गाला जे देतो, त्याच्या दुप्पट प्रमाणात निसर्ग परतफेड करत असतो असंही जावडेकर यावेळी म्हणाले.

यावेळी जावडेकर यांनी प्राणी मित्र पुरस्काराचंही ऑनलाईन वितरण केलं. पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईतल्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातले पशुपालक गुरुनाथ नार्वेकर यांचाही समावेश आहे.