नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीकरणात करोना साथनियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लशीचे डोस तयार झाल्यानंतर सर्व राज्यांना योग्य आणि न्याय्य पद्धतीने त्यांचे वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिली.
लसीकरणासाठी प्राधान्य असलेल्या लोकसमूहांच्या याद्या राज्यांनी ऑक्टोबरअखेपर्यंत केंद्राला देणे अपेक्षित आहे. या याद्यांमध्ये साथ नियंत्रणाच्या आघाडीवर काम करणारे सरकारी आणि खासगी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कर्मचारी, रुग्ण- संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणारे, चाचण्या करणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आदींचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लशीच्या ४०-५० कोटी मात्रा जुलै २०२१पर्यंत उपलब्ध होतील. त्यातून सुमारे २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज आहे. लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.