मुंबई  : अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अशासकीय खाजगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.

राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे, 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.