नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक संमत होणे म्हणजे संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक संमत होण्याचे स्वागत केले आहे.

आपण एकत्रितपणे प्रगती करू आणि 130 कोटी भारतीयांची स्वप्ने साकार करू, अशी आशा पंतप्रधानांनी अनेकदा ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील माझ्या भगिनी आणि बंधूंना मी त्यांनी दाखवलेले धाडस आणि जिद्दीबद्दल सलाम करतो, असे ते म्हणाले.

अनेक वर्षे छुपे स्वार्थ जपणाऱ्या आणि भावनिक दबाव टाकण्याचे तंत्र अवगत असलेल्या गटांनी कधीच जनतेच्या सक्षमीकरणाची पर्वा केली नाही. जम्मू आणि काश्मीर आता शृंखलातून मुक्त झाले आहे. एक नवी पहाट, एक अधिक चांगला भविष्यकाळ प्रतीक्षा करत आहे, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले.

जम्मू, काश्मीर आणि लडाखशी संबंधित हे विधेयक एकात्मता आणि सक्षमीकरणाची हमी देईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. या पावलांमुळे तेथील तरुणांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांचे कौशल्य आणि गुणवत्ता प्रदर्शित करण्याच्या अगणित संधी उपलब्ध करून देता येतील. स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी लडाखच्या जनतेचे विशेषत्वाने अभिनंदन केले. आपला प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात यावा ही त्यांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणे ही बाब अतिशय आनंदाची आहे. या निर्णयामुळे या भागातील एकंदर समृद्धीला चालना मिळेल आणि विकासाच्या आणखी चांगल्या सुविधा निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

जम्मू, काश्मीर आणि लडाखशी संबंधित महत्त्वाची विधेयके संमत झाल्यामुळे भारताच्या अखंडतेसाठी ज्यांनी काम केले ते महान सरदार पटेल, ज्यांचे विचार सुप्रसिद्ध आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची एकता आणि एकात्मता यासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले ते श्यामा प्रसाद मुखर्जी  यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

संसदेत राजकीय पक्षांनी आपल्या विचारसरणीतील मतभेद बाजूला सारले आणि अतिशय समृद्ध अशा संवादात सहभाग घेतला, ज्यामुळे आपल्या संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा उंचावली आहे, अशी प्रशंसा पंतप्रधानांनी केली. त्यासाठी मी सर्व खासदार, विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे अभिनंदन करत आहे, असे ते म्हणाले.

एका वेगळ्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या जनतेने आपल्या खासदारांनी मतभेद बाजूला सारून त्यांच्या प्रदेशाच्या भवितव्याबाबत त्याचबरोबर तेथील शांतता, प्रगती आणि समृद्धीबाबत चर्चा केल्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.  राज्यसभेत 125 विरुद्ध 6 आणि लोकसभेत 370 विरुद्ध 70 अशी आकडेवारी या विधेयकाला असलेला व्यापक पाठिंबा स्पष्टपणे दाखवून देत आहे.”

भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, कोटा  यांनी दोन्ही सभागृहांची हाताळणी अतिशय उत्तम पद्धतीने केली, ज्यासाठी संपूर्ण देशाच्या प्रशंसेला ते पात्र आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विशेष अभिनंदन केले. जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या जनतेचे जीवनमान उंचावावे यासाठी आमचे गृहमंत्री सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा या विधेयकांच्या मंजुरीतून स्पष्ट दिसत आहे. अमितभाईंचे मी विशेष अभिनंदन करतो.