मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर, पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज दूरदृष्य प्रणाली माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक अन्न मिळेल, याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यानं झोडपलं असून नद्यांना आलेल्या पुरामुळे अंदाजे २० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना दिल्या.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गेल्या दोन दिवसांत राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ३१९ घरांचं नुकसान झालं, तर ५७ हजार ३५४ हेकटर क्षेत्रावरच्या पिकाचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, पावसामुळे या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून बैठक घेणार आहेत.