मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली, तर विकास वास्तवात उतरु शकतो, त्यासाठी विकास आराखडा तयार होणं महत्त्वाचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांच्या, ४८ व्या संयुक्तट कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२० चं, त्यांनी आज ऑनलाइन उदघाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

   डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ-अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद- पुणे, यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यामुळे समृद्ध शेतकरी घडणं फार महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

  हा कृषी क्षेत्रातला महामेळावा असून कृषी क्षेत्रात, माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणं, तसंच शेती शाश्वत होणं गरजेचं आहे असं मत, केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

  प्रत्येक संशोधन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचणं गरजेचं असून अधिकाअधिक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलं.