नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत भेटीवर येत आहेत. यावर्षी मे महिन्यात जनरल रॉबर्ट किबोची केनियाचे संरक्षण दल प्रमुख बनले. त्यानंतर ते पहिल्यांदाच आफ्रिकेबाहेरच्या देशाच्या म्हणजे भारतभेटीवर येत आहेत. या सप्ताहभराच्या भेटीमध्ये जनरल किबोची भारताचे संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तीनही दलांचे प्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेणार आहेत.
जनरल किबोची आपल्या या भारत दौऱ्यात आग्रा, महू आणि बंगलुरू येथे भेटी देणार आहेत. विशेष म्हणजे किबोची यांची ही काही पहिलीच भारत भेट नाही. त्यांनी काही काळ भारतामध्ये वास्तव्य करून महूच्या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग अभ्यासक्रमातली सिग्नल अधिकारी म्हणून पदवी घेतली आहे. या शिक्षणासाठी ते 1984 – 1987 या काळामध्ये महू येथे राहिले होते.
भारत आणि केनिया यांच्यातील व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ बनले जात असतानाच जनरल किबोची भारत भेटीवर येत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाला भेट दिली होती. त्यानंतर केनियाचे राष्ट्राध्यक्ष केन्याट्टा यांनी 2017 मध्ये भारताला भेट दिली. उभय नेत्यांच्या भेटींमुळे दोन्ही देशांमध्ये संबंध सुदृढ होण्यास मदत झाली. उभय देशांनी संरक्षण सहकार्य, क्षमता निर्मिती, दहशतवादी कारवायांना विरोध, संयुक्त राष्ट्राची शांतता मोहीम, वैद्यकीय आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा अशा विविध क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याचे निश्चित केले आहे.
भारत आणि केनिया यांच्यामध्ये परिपक्व लोकशाही असून दोन्ही देशांकडे व्यावसायिक सशस्त्र दले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये अनेक स्तरांवरच वैचारिक अभिसरण करण्यात आले आहे. जनरल किबोची यांच्या या भेटीमुळे उभय देशांमध्ये अधिक मजबूत संबंध निर्माण होतील. दि. 7 नोव्हेंबर, 2020 रोजी जनरल किबोची मायदेशी परतणार आहेत.