नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशात आत्तापर्यंत ७६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे रुग्णबरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे. एकूण ७६ लाख ५६ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेली रुग्णसंख्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा १४ पट जास्त आहे.

गेल्या २४ तासात देशात ५३ हजारांच्यावर रुग्ण बरे झाले तर नवीन ४६ हजार रुग्णांची भर पडली आहे. गेले काही दिवस सातत्याने देशभरातल्या रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यू दरही १ पूर्णांक ४९ शतांश टक्के इतका खाली गेला आहे.

गेल्या २४ तासात ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातले ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण अधिक रुग्णसंख्या असलेल्या १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले होते.

गेल्या २४ तासात देशभरात सुमारे १२ लाख १० हजार कोरोंना चाचण्या करण्यात आल्या असून आत्तापर्यंत देशात ११ कोटी ३० लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जानेवारीत पुण्यातल्या एन.आय.व्ही. या एकमेव प्रयोगशाळेनंतर आता देशभरात ११३४ सरकारी आणि ९११ खाजगी अशा एकूण २ हजार ४५ प्रयोगशाळा आहेत.