नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातील ५३ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले.
त्यामुळे आत्तापर्यंत या आजारातून बरे झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या ७८ लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात पाच लाख १६ हजार रुग्णांवर उपचार सुरु असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ६ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे.
गेल्या २४ तासात देशात ५० हजार तीनशे ५७ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ८४ लाखांवर गेली आहे. त्वरित तपासणी, सातत्यानं पाठपुरावा आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रीची नियोजनपूर्वक अंमलबजावणी सर्व स्तरांवर होत असल्यानं देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
सध्या देशातील कोविड-१९ च्या रुग्णांचा मृत्युदर १ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे. हा आजमितीला जगातील सर्वात कमी मृत्युदर आहे. देशातील आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १ लाख २५ हजार पाचशे ६२ झाला आहे.