नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि कार्य आजही देशातील तरूण वर्गाला प्रेरणादायी आहे. विश्वातील लाखो व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या या महान व्यक्तीमत्वाबद्दल भारताला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. स्वामी विवेकानंदाचे आदर्श जसे त्या काळात मार्गदर्शक ठरले तसेच ते आताही कालसुसंगत आहेत असे पंतप्रधान नेहमीच म्हणत आले आहेत.
समाजाची सेवा आणि तरुणवर्गाचे सक्षमीकरण यामुळे देशाची भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक उन्नती होते तसेच अखिल विश्वात देशाची प्रतिमा उजळते यावर पंतप्रधान नेहमीच भर देत आले आहेत. भारताची समृद्धी आणि शक्ती ही येथील लोकांमध्ये वसलेली आहे, म्हणून सर्वांच्या सक्षमीकरणाने देशाला आत्मनिर्भरता या उद्दिष्टाप्रत जाता येईल.