नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसर साईट म्हणून घोषित झाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. स्वित्झर्लँडमधली रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट ही आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता आणि इतर निकषांवर जागतिक स्तरावर महत्त्वाची स्थळं रामसर साइट म्हणून घोषित करते. यापूर्वी नांदूर मध्यमेश्वर ही राज्यातली पहिली रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित झाली होती. लोणार सरोवराला हा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून संबंधित संस्थेकडे पाठपुरावा चालू होता.
लोणार सरोवर ही रामसर साईट म्हणून घोषित झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागाचं अभिनंदन केलं असून, या पर्यटन स्थळाकडे जागतिक पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं. लोणार सरोवर परिसर निसर्ग पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून पर्यटन विभाग आणि वन विभाग संयुक्तपणे यासाठी काम करेल अशी माहितीही राठोड यांनी दिली.