नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज १२ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.
रशियाच्या नेतृत्वाखाली ब्रिक्सच्या दहशतवादविरोधी धोरणाला अंतिम स्वरुप मिळाल्याबंद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारत आपल्या नेतृत्वात हे धोरण आणखी पुढे नेईल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रिक्सचं नेतृत्व करताना भारत सदस्य देशांमधे देशांमध्ये डिजिटल आरोग्य आणि पारंपरिक औषधांना चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औषध उत्पादन क्षेत्रात भारत सक्षम असल्यानंच, कोरोना लॉकडाऊनच्या काळात दीडशेहून अधिक देशांना औषधांचा पुरवठा करू शकल्याचं त्यांनी नमूद केलं.
भारताची लस उत्पादन आणि वितरणाची क्षमता मानवजातीसाठी मदतीची ठरणारी आहे, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या युद्धात युरोप, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियासारख्या क्षेत्रांमधे भारतातले २५ लाखांहून अधिक सैनिक सहभागी झाले होते असंही त्यांनी सांगितलं.