नवी दिल्ली : रेल्वे विभागाच्या सर्व जागा, परिसर आणि वाहनतळांवर ठेवलेल्या बेवारशी वाहनांचा तपास करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ असे या मोहिमेचे नाव असून आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.

रेल्वे परिसरात असलेली अवैध बेवारशी वाहने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तसेच 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत देशभरातल्या 466 रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात आली. या दरम्यान 4 चोरीला गेलेली वाहने सापडली तसेच 3 हजार 943 वाहनांवर कोणीही मालकी हक्क दाखवला नाही. त्यापैकी 894 संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. तसेच 2 हजार 34 वाहने नो पार्किंग क्षेत्रात आढळली. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध पार्किंग संदर्भात 59 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.