नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे कायदे आहेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा ७१वा भाग होता. या कायद्यांची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असे मोदी यांनी आजच्या मन की बातमधून सुचवले.
या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याचा उल्लेखही मोदी यांनी केला.
आजच्या मन की बातमधून मोदी यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करत असलेले राज्यस्थानमधले मोहम्मद अस्लम आणि सुगीनंतर शेतात उरलेल्या काडी कचऱ्यातून आर्थिक संधी निर्माण करणारे हरयाणातले शेतकरी विरेंद्र यादव यांच्या अभिनव उपक्रमांची माहिती देशवासीयांना दिली.
सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे महत्वाचे आहे असे मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये नमूद केले. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातल्या अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीने जतन करण्याचे काम सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशातल्या अनेक वस्तुसंग्राहलये आणि ऐतिहासिक वास्तुंचे डिजीटायझेशन केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी परदेशातल्या अशा काही प्रयत्नांचा उल्लेखही केला.
संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावते असे ते म्हणाले. भारतातून साधारण शंभर वर्षापूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नपुर्णेची मुर्ती पुन्हा भारतात आणली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कामी कॅनडा सरकार आणि इतरांनी मदत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले.
भारताचा सांस्कृतिक ठेवा अशा रितीने चोरला जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होऊन वेदांच्या प्रसारासाठी कार्य करत असलेल्या ब्राझीलमधल्या जॉनस मस्सेट्टी यांच्या कार्याची प्रधानमंत्र्यांनी आज मन की बातमधून देशवासीयांना ओळख करून दिली.
न्युझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडूनकीत निवडून आलेले तिथले संदस सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी संस्कृतमधे शपथ घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही अभिमानास्पद घटनेसाठी गौरव शर्मा यांचे आभार मानून त्यांनी शर्मा यांना पुढच्या कारकिर्दिसाठी शुभेच्छाही दिल्या.
देशातले महान पक्षीनिरीक्षक सलीम अली यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त सलीम अली यांच्या कार्यकतृत्वाला त्यांनी उजाळा दिला. अलिकडेच केवडिया इथे आपण पक्षांसोबत घालवलेला वेळ संस्मरणीय असल्याचं सांगून, त्यांनी देशातल्या तरुणांना पक्षी निरीक्षण संघटनांशी जोडून घ्यायचे आवाहन त्यांनी केले.
येत्या ३० नोव्हेंबरला श्री गुरू नानक देव जी यांचे ५५१ वे प्रकाश पर्व साजरे करणार आहोत असे सांगून मोदी यांनी गुरु नानक यांचे विचार आणि कार्याचा मागोवा घेतला.
गुरु नानकांचे वास्तव्य राहिलेल्या कच्छ मधल्या लखपत गुरूव्दारा साहिबच्या जीर्णोद्धाराच्या, तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहिब कॉरिडॉर मुक्त करण्याच्या कामात आपल्याला काही भूमिका बजावता आली, ही गुरु नानक देव यांची आपल्यावरची कृपा आणि आशिर्वाद असल्याचे ते म्हणाले.
येत्या ५ डिसेंबरला श्री अरबिंदो यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करून मोदी यांनी अरबिंदो यांच्या स्वदेशी आणि शिक्षणविषयक विचारांचा मागोवा घेतला.
भारतीय कारागिरांनी, कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे असे विचार अरबिंदो यांनी मांडले होते. असे असले तरी परदेशांकडून शिकण्याला विरोध न करता, जे नवे ते शिकावे आणि देशासाठी चांगले असेल, त्यात सहकार्य करावे हा विचारही अरबिंदो यांनी दिला होता असे त्यांनी सांगितले.
अरबिंदो यांचे हे विचार म्हणजेच आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राचा मतितार्थ आहे असे मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये सांगितले.
येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, या दिवशी देशाविषयीचे आपले संकल्प आणि संविधानाने नागरिक म्हणून आपल्याला दिलेली कर्तव्य पूर्ण करायच्या शिकवणीचे स्मरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
अलिकडे अनेकदा महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाल्याने आपल्याला नवी उर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना महत्वाच्या असतात असे सांगून, त्यांनी अशा अनेक संघटनांच्या कामाचा आजच्या मन की बातमधे उल्लेख केला.
असे काम होत राहण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्याशी आपले बंध अधिक मजबूत करत राहावे तसेच शिक्षण संस्थांनाही माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होऊन गेल्यावर आज कोरोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली, तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण मोदी यांनी करून दिली. कोरोनाविरुद्धचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे असे सांगून, त्याविरुद्धचा लढा कायम ठेवायचा आहे असे आवाहन त्यांनी केले.