मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढल्याने चालू वर्षी सांगली बाजारातून १६ लाख हळद पोत्यांची निर्यात झाली. जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात हळद निर्यातीत १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

हळदीच्या भावात चढ-उतार असले तरी शिल्लक मालाचा विचार करता दर चांगले आहेत. हळदीला, देशांतर्गत मागणीसह परदेशातही दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव या भागात दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशातील हळदीलाही चांगली मागणी आहे. सांगली मार्केट यार्डात देशातील सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येते.

सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. डिसेंबर अखेर हळद उलाढालीची स्थिती अशीच राहणार आहे. दरवर्षी भारतातून ५० किलोची सात लाख पोती हळद निर्यात केली जाते. यावर्षी १६ लाख पोती निर्यात झाली.

देशात साधारणतः ९० लाख पोती हळदीचे उत्पादन होते. त्यापैकी ७५ लाख पोत्यांची विक्री होते. दरवर्षी १५ ते २० लाख पोती हळद शिल्लक राहते. जागतिक बाजारात हळदीची मागणी वाढल्यामुळे यावर्षी सर्व शिल्लक माल संपुष्टात येणार अशी स्थिती आहे.