नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त केली. शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी निदर्शनं थांबवावीत आणि चर्चा करावी, असं आवाहन सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं. या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे.
शेतकरी संघटनांनी या समितीसाठी आपली ४-५ नावं द्यावीत, सरकारचेही काही प्रतिनिधी यात असतील तसंच कृषी तज्ञांचाही यात समावेश असेल. ही समिती कृषी कायद्यांवर चर्चा करून त्यात काय त्रुटी आहेत ते तपासेल आणि त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवेल, असं कृषिमंत्री तोमर यांनी बैठकीत सांगितलं.
देशातील ३२ संघटनांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला उपस्थित होते; तर सरकारतर्फे कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत चर्चा केली.