सांगली : ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज ब्रह्मनाळ येथे प्रत्यक्ष भेट देवून ग्रामस्थांना धीर दिला.
यावेळी प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. आशिष येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे उपस्थित होते.
धोकादायक इमारतीत लोकांनी पुन्हा राहण्यास जावू नये, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीस स्वच्छतेसाठी निधी देण्यात आला आहे. घरांचे, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील.
डॉ. चौधरी यांनी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. सरपंच उत्तम बंडगर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आवश्यक मदत व उपाययोजनांची माहिती दिली. खंडित वीजपुरवठा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान, रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण होण्याची गरज, विजेचे खांब बदलण्याची गरज, वॉटर ए. टी. एम यासह अन्य अडचणी ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या. गावात अद्याप वीजयंत्रणा सुरू नसल्याचे कळल्यानंतर डॉ. चौधरी यांनी उद्या दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थिती वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या.
डॉ. चौधरी यांनी बोट दुर्घटनेत मृतांचे कुटुंबीय रावसाहेब पाटील आणि आनंदा कारंडे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. तसेच, डॉ. अभिजीत चौधरी यांनी गावात विविध ठिकाणी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली. यावेळी ब्रह्मनाळ हायस्कूल येथे प्रशासनाकडून मदत मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी आभारपत्र दिले. यावेळी ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या ब्रह्मनाळ भेटीमुळे ग्रामस्थांच्या जखमेवर फुंकर घालली गेली असल्याची प्रतिक्रिया दिसत होती.
सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मिळाला हरिपूरला आधार
महापुरात सांगलीचे अपरिमित नुकसान झाले. कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीसह जिल्ह्याच्या 4 तालुक्यात अपरिमित हानी झाली. या पार्श्वभूमिवर पूरबाधितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मदतीचे आवाहन केले. त्याला सोलापूरवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या पार्श्वभूमिवर हरिपूरचे सरपंच विकास हणबर यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे आभार मानले. ते म्हणाले, आमच्या या गावाच्या अडचणीच्या काळात गाव दत्तक घेऊन व सोलापुरातून लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत आली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आमच्या गावात येऊन, स्वच्छता अभियानात हातभार लावत आहेत. यामुळे आज आम्हाला खूप मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.