मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावर लस मिळेल अशी स्थिती दिसत असली तरी, लस घेतल्यावरही, कोरोनाचा धोका संपला असं म्हणता येणार नाही, त्यामुळेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करत राहावं असं आवाहन आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी साधलेल्या संवादावेळी केलं.
कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊननंतर, आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येतंय, सुरुवातीच्या निर्बंधांनंतर आता काही जणांच्या जगण्या-वागण्यातही शिथिलता दिसू लागली आहे. अनेकजण खबरदारी घेत आहेत, मात्र खबरदारी न घेणाऱ्या काहीजणांमुळे परिस्थिती बिघडू शकते असा इशारा त्यांनी दिला. अनेकजण पुन्हा लॉकडाऊन करावा, रात्रीची संचारबंदी करावी असं सुचवत असले, तरी तशी गरज दिसत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. खबरदारी घेतली नाही, तर युरोपात कोरोनामुळे बिघडू लागलेल्या स्थितीसारखी परिस्थिती आपल्यावरही ओढावू शकते असं त्यांनी सूचवलं.
अलिकडेच राज्य सरकारनं अनेक राजकीय संकटं परतावून लावत एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांनी या वर्षभरात राज्य सरकारनं केलेल्या विकासकामांविषयी देखील माहिती दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम वेगानं सुरु असून, या महामार्गावरचा नागपूर ते शिर्डी मार्ग १ मे पासून सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुर्गातलं चिपी विमानळ येत्या जानेवारी महिन्यापासून सुरु करायचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय मुंबईचा सागरी मार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा नवा बोगदा यासह पायाभूत सोयीसुविधांच्या बाबतीत सुरु असलेल्या इतर विकास कामांची माहिती त्यांनी दिली.
पैशांची अडचण असूनही, शेतकऱ्यांना मदत देण्यासह, विकासकामांसाठीही राज्य सरकार मार्ग काढत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठीच सरकार घाई न करता ठोस काम करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधे आज सुचवलेली जागा भविष्यात अपूरी पडणारी असल्यानं, नव्या गरजेमुळे तिथल्या जंगलाचं अधिक नुकसान होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.