मुंबई (वृत्तसंस्था) : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढवली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.

यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश केला असून काही पुरस्कारांचे निकष बदलले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य शासनामार्फत सन १९६७ पासून कृषिक्षेत्रातील विविध पुरस्कार दिले जातात.

त्यात पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार आणि शेतिनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे. कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठीचे पात्रता निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढवायला मान्यता देण्यात आली.