नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९७ लाख ६१ हजार ५०० च्या पुढे गेली आहे.
देशात काल कोरोनाचे १८ हजार ७०० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्येनं १ कोटी १ लाख ८७ हजार ८ शे चा टप्पा पार केला. तर २७९ जणांचा मृत्यू झाल्यानं या आजारानं दगावलेल्यांची एकूण संख्या १ लाख ४७ हजार ६ शे पेक्षा जास्त झाली.
सध्या देशात २ लाख ७८ हजार ६ शे पेक्षा जास्त रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून गेल्या १७० दिवसांमधली ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. एका दिवसात नोंद होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या काल सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच १९ हजाराच्या खाली राहिली, तसंच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या यातलं अंतर सतातत्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.