नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून तो ९५ पूर्णांक ८३ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. देशात काल २१ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९७ लाख ८२ हजाराच्या पुढे गेली आहे. तसंच देशात सध्या २ लाख ७७ हजार रुग्ण उपचार घेत आहेत असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
देशात काल कोरोनाच्या २० हजार २१ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या १ कोटी २ लाखाच्या पुढे गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या चाचणी, तपास आणि उपचार या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर मृत्यू दरात घट होत आहे.
देशात काल २७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं या आजारानं दगावलेल्यांची एकूण संख्या १ लाख ४७ हजार ९०१ वर पोहोचली. देशाचा कोरोना मृत्यू दर १ पूर्णांक ४५ शतांश टक्क्यावर स्थिर असून तो जगातला सर्वात कमी मृत्यू दर आहे. असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान देशात काल ७ लाख १५ हजारापेक्षा जास्त कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या १६ कोटी ८८ लाखाच्या पुढे गेल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.