नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधील शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या १०० व्या किसान रेलला व्हिडिओ लिंकद्वारे रवाना करतील.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसंच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यावेळी नवी दिल्लीहून व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थित राहणार आहेत.या किसान रेलची साप्ताहिक ट्रेन म्हणून ऑगस्ट मध्ये सुरुवात झाली,लोकप्रियता मिळाल्यानं आता आठवड्यातून तीन दिवस ही किसान रेल धावते आहे.

लॉकडाऊन दरम्यानही रेल्वे आणि शेती या दोहोंनी आपले काम चालू ठेवले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात धान्य पोहोचविण्याचं काम केलं. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात किसान रेलची घोषणा करण्यात आली होती.

२१ नोव्हेंबरला सांगोला-शालीमार किसान रेल्वे सुरू झाली होती. फुलकोबी, शिमला मिर्ची, पान कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा इत्यादी भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सिताफळे यासारख्या फळांची वाहतूक ही गाडी करते आहे.