नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.

केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या विशेष समितीनं एक जानेवारी रोजी  या लसींच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती. त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

एस्ट्राचजेनेका आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपण तयार केलेल्या लशींच्या चाचण्यांबाबतचा अहवाल सादर केला असून त्यांना  या लसींच्या नियंत्रित वापराची परवानगी दिल्याचं सोमानी यांनी सांगितलं.

दरम्यान कोविशील्ड ही देशाची पहिली कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी असून येत्या काही आठवड्यांमध्ये या लसीचा वापर सुरु होईल असं सिरम इन्स्टिट्यूट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.