मुंबई (वृत्तसंस्था) : दर्पण दिन आज साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

आज दर्पण दिनानिमित्ताने ठिकठिकाणी ऑनलाईन कार्यशाळा, परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्याच्या कंधार इथल्या दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर झाले.

भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीड इथले पत्रकार अशोक देशमुख यांना तर धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीड इथले पत्रकार प्रताप नलावडे यांना जाहीर झाला आहे.

आज सायंकाळी अंबाजोगाई इथं नगर परिषदेच्या सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.पत्रकारांनी ज्ञान माहितीचे वाहक होण्याचं आवाहन, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या दर्पण दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. ‘कोरोनानंतर उस्मानाबाद जिल्हा व्हिजन २०२१’ या विषयांवर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई, पुरातन स्थळांचा विकास, शेत रस्ते, तसंच स्थानिक गरजानुरूप मूलभूत विकास कामं करण्याचा मानस व्यक्त केला.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकारांना विमा कवच पॉलिसी वाटपही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं.