मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

राज्यसरकारनं सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचे आदेश दिले असून, अधिकारी एकदंर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या ८०० कोंबड्याचा ‘बर्ड फ्लू’मुळेच मृत्यु झाला असून मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

या गावाच्या १० किलो मीटर परिसरात पक्ष्याच्या खरेदी-विक्रीसह अवागमनास निर्बंधही जारी करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथील कुक्कुट पालन केंद्रातील काही कोंबड्या काल अचानकपणे मेल्याची माहिती मिळताच लातूर जिल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला, यासंदर्भाने चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

देशातील कांही राज्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची चर्चा सुरु असताना अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एक पोल्ट्री फार्म मधील ३५० कोंबड्या अचानक दगावल्या. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी, पशुसंवर्धन विभागाला सतर्क करून केंद्रेवाडी परिसरात आवश्यक त्या उपाययोजना राबवायला सांगितले आहे, मयत कोंबड्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्याच्या मृत्यूचे कारण कळणार आहे, तोपर्यंत नागरिकांनीही मांसाहराबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेनं नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यांनी केलं आहे.

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली  हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याठिकाणी टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.