नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स करण्यासाठी कोळसा खाण क्षेत्राचे योगदान महत्वाचे असून या क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, एक खिडकी योजनेद्वारे पारदर्शकता आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी आज नवी दिल्लीत केले.

कोळसा खाणीच्या मंजुरीसह सर्व संबंधित कामांसाठी केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी वेब पोर्टलचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमित शहा पुढे म्हणाले की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या खनिज संपत्तीचा योग्य उपयोग करून पायाभूत अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देणे आवश्यक आहे.

कोळसा उत्पादक कंपन्यांनी यासाठी वेगाने प्रयत्न करावेत. कोळसा खाणीच्या माध्यमातून पूर्वोत्तर राज्यामधील जनजातींचा विकास होऊन राज्यांनाही साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकेल तसेच सुमारे ७०,००० रोजगार निर्मितीही होऊ शकेल अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली.