पुणे:- छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन  कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांचा 341 वा राज्यभिषेक सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर येथे पार पडला. यावेळी आमदार अशोक पवार, शंभूराजे राज्यभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कंद, सिद्धांत कंक, आकाश कंक, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, तुळापूर ग्रामस्थ तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शंभूभक्त उपस्थित होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री  भुजबळ म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दूरचित्रवाणी मालिकेच्या माध्यमातून  जगाच्या काना कोपऱ्यात पोहचविण्याचे काम झाले. छत्रपती संभाजी राजे यांनी अनेक लढाया जिंकत आपला पराक्रम सिद्ध केला. आपण या पराक्रमापासून प्रेरणा घेत महाराजांचा इतिहास जगाच्या समोर आणला पाहिजे. तसेच जनता, राज्य तसेच राष्ट्राची सेवा केली पाहिजे. राज्यभिषेक सोहळा प्रत्येक वर्षी उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास एका दृष्टिक्षेपात  कळण्यासाठी शंभुसृष्टी निर्मितीच्या कार्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी मास्क लावले पाहिजे, सामाजिक अंतराचे पालन केले पाहिजे, लस घेतली पाहिजे, असे   आवाहनही त्यांनी केले.

आमदार अशोक पवार म्हणाले, आपल्या परिसरातील तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. श्री क्षेत्र तुळापूर तीर्थक्षेत्र ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात समाविष्ट करण्याबरोबरच या भागात आधुनिक व्यायामशाळा, वाचनालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तुळापूर येथील ग्रामपंचायत  निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील  सावरगाव हडपला शंभू गौरव पुरस्कार तसेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना महाराणी येसूबाई गौरव पुरस्कार,  राजाराम निकम यांना शंभुराजे सामाजिक पुरस्कार,  लक्ष्मणराव कुंजीर, अनुप मोरे यांना शंभुराजे उद्योजक पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे यांना शंभुराजे पत्रकारिता पुरस्कार श्री. शंभूराज्यभिषेक  ट्रस्टच्यावतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री    श्री भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गाडे आणि आभार संतोष शिवरे यांनी केले.