नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. 30 मिनिटं चाललेल्या या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही नेत्यांमधल्या सौहार्दपूर्ण संबंधांना अधोरेखित करणारा संवाद झाला.

यावेळी पंतप्रधानांनी ओसाका येथे जी-20 शिखर परिषदेनिमित्त दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवण केली. या चर्चेचा संदर्भ देत भारत आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री लवकरच द्विपक्षीय व्यापारी संबंधांविषयक बैठक करतील, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. परस्पर लाभासाठी ही बैठक आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

प्रादेशिक स्थितीविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतविरोधी वातावरण निर्माण करून हिंसा भडकवणाऱ्या भावना आणि अतिरंजीत वक्तव्य करणाऱ्या काही नेत्यांचा प्रयत्न या प्रदेशाच्या शांततेसाठी घातक आहे. कुठलाही अपवाद न करता सीमापार दहशतवाद समूळ नष्ट करणे आणि या प्रदेशातील वातावरण दहशत आणि हिंसेपासून मुक्त करणे, महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

या मार्गावर, आणि दारिद्रय निरक्षरता तसेच आजारांपासून हा प्रदेश मुक्त करण्यासाठी जो कोणी साथ देईल त्याच्याशी सहकार्य करण्याच्या भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरूच्चार केला.

अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला आज 100 वर्ष पूर्ण होत असल्याचे स्मरण करत पंतप्रधानांनी यावेळी एकीकृत सुरक्षा, लोकशाही आणि स्वतंत्र अफगाणिस्तानची उभारणी करण्यास भारताच्या दीर्घकालीन कटिबद्धतेचा उल्लेख केला.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत नियमित स्वरुपात संवाद साधण्याविषयी पंतप्रधानांनी यावेळी समाधान व्यक्त केले.