नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्तरप्रदेशातल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन हजार 691 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला. ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे सहा लाख जणांना याचा लाभ होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या कार्यक्रमाला उपस्थित होते.  पंतप्रधानांनी काही लाभार्थींसोबत संवादही साधला.

आपलं स्वत:चं घर असावं, हे स्वप्नही अशक्य वाटावं, अशा गरीबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार पुढे येत आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. आज गुरु गोविंदसिंग यांची जयंती आहे. त्यांचा आशीर्वाद आम्हाला सतत मिळत आहे, असा मला विश्वास आहे. ही योजना म्हणजे महिला सबलीकरणाचंही उत्तम उदाहरण आहे. कारण ही घरं आणि घरबांधणीसाठी जमिनीचा तुकडा महिलांच्या नावावर असणार आहे. उत्तर प्रदेशाला आज अनेक विकास योजनांच्या आधारे एक नवा चेहरा मिळतआहे.  प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशात सुमारे 10 कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. विविध विकास योजनांचा उद्देश सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर व्हावं, हाच आहे, असंही मोदी म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सर्वाधिक नऊ पुरस्कार उत्तर प्रदेशानं गेल्या वर्षी पटकावले होते. या योजनेतील लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल कामगार निधीही मिळणार असून स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रूपयांचा अतिरिक्त मदतनिधीही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत सुमारे एक कोटी 26 लाख घरं बांधण्यात आली आहेत.