नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. जे कोरोना लसीकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवताना आढळून येतील अशा लोकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय दंडविधानाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
अफवा आणि खोट्या बातम्या थांबविण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक तथ्यांच्या आधारे विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे. अफवा पसरविणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविरूद्ध कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित केलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचं देशातील राष्ट्रीय नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
१६ जानेवारीला कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यापासून समूह माध्यमांवर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. असा खुलासा गृहसचिवांनी आपल्या या पत्रात केला आहे.