पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह प्रकल्प योजनेच्या कामांची आज पाहणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह प्रकल्पाचे काम लवकरात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचबरोबर भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ, सदनिकेचे चटई क्षेत्र, एकूण सदनिका, गृहप्रकल्पातील एकूण व्यापारी गाळे, प्रकल्प उभारणीकरीता लागणारा खर्च, सदनिकेची विक्री किमंत तसेच रंगरंगोटी, क्रीडांगण, पार्किंग, उद्वाहिका, सोलर पॅनलची व्यवस्था, पाण्याचे नियोजन, ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, क्लब हाऊस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छतागृह, फर्निचर, अग्निशामक यंत्रणा, अग्निप्रतिबंधक दरवाजा, मैला सांडपाण्याचे वाहिन्या, वाहतूक आदि पायाभूत सोई सुविधांची माहिती जाणून घेतली. गृह प्रकल्पाची माहिती क्रिएशन्स् इंजिनिअर्स प्रा. लि.चे रमाकांत भुतडा यांनी दिली.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माजी महापौर मंगला कदम, संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.